मदर्स डे च्या निमित्ताने.... ही पोस्ट मुद्दामच एक दिवस उशिराने टाकली आहे. कालच ( १४ मे) झालेल्या "मदर्स डे" ला खूप जणांचे लेख वाचले, स्टेटस बघितले. आपण कितीही मोठे झालो तरी ही ज्यांच्या अवती भोवती असताना, आपण आपले वय विसरतो ते आपले आई - बाबा.
बहात्तर वर्षाची आई जेव्हा "बस, मस्त आलं घालून चहा करते" असं म्हणते, तेव्हा एक मन म्हणतं आई ला नको सांगू, तूच कर की चहा. तेव्हाच दुसरं मन सांगतं, आई दे तुझ्याच हातचा चहा! ह्या संदर्भात, गेल्या अनेक वर्षात व्यक्ती बदलली आहे, पण नातं तेच आहे. ए आई असो किंवा अहो आई असो; मला चहा करावाच लागत नाही.
मग मनात विचार आला, आईचीच मुलाखत घेतली तर... चहा पिता पिता...
आई गं, तुला तू लहानपणची लक्ख आठवते की मी?
मीच मला जास्त आठवते. कारण तू आईकडे होतीस ती १२ वर्ष कमी आठवतेस.
तुझ्या लहानपणची एखादी चांगली आठवण जी तुझ्या मनात अजून घर करून आहे...
मला आठवणारी पहिली चांगली आठवण...
माझं सातवीपर्यंतचं शिक्षण मुंबई महापालिकेच्या शाळेत झालं. त्याकाळी महानगरपालिका सातवीपर्यंतच शिक्षण द्यायची. आठवी ते अकरावीसाठी खाजगी शाळेत जावं लागायचं. ६६ साली सातवीत असताना मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता व त्यात नंबर आला म्हणून पुढे आंतर् शालेय वक्तृत्व स्पर्धेत मला शाळेने धाडलं. त्याचा निकाल मला कळलाच नाही. आठवीत मी दहिसरातल्या आजच्या सुप्रसिद्ध विद्यामंदिर शाळेत प्रवेश घेतला.आठवीत असताना एकदा महानगरपालिकेच्या शाळेतून मला 'शाळेत येऊन हेडमास्तरांना भेट' असा निरोप आला. माझी एकदम घाबरगुंडी उडाली. काय झालं आपल्या हातून काही समजेना. हेडमास्तरांना भेटले तेव्हा पाय अक्षरशः लटपटत होते, छातीत धडधडत होतं, घशाला कोरड पडली होती. आश्चर्य हे की हेडमास्तरांनी मला (वट्ट) ७ रुपये दिले आणि म्हणाले त्या आंतर् शालेय वक्तृत्व स्पर्धेत तुझा तिसरा नंबर आलाय..बक्षीसादाखल हे पैसे महानगरपालिकेने पाठवले आहेत. क्षणात भितीचं रुपांतर आनंदात झालं. हेडमास्तरांनी माझी पैसे मिळाल्याची सही घेतली. ते माझं आयुष्यातलं पहिलं बक्षीस. मग हेडमास्तरांनी विचारलं ह्या पैशांचं काय करणार....वाचनाची आवड असल्याने मी ताबडतोब सांगितलं...पुस्तकं घेणार. सात रुपयांत पुस्तक येतं की नाही हेही मला माहित नव्हतं, कळत नव्हतं. ते पैसे मी आईलाच दिले.
वाचनाची आवड असल्याने तेव्हा मी दौलत, हत्या वगैरे पुस्तके वाचनालयातून आणून वाचली होती. त्यामुळे मला पुस्तकं आणण्याचं पटकन सुचलं.
ही घटना मला अजून आठवते आणि मग 'पुस्तकं घेणार' हे माझं बाणेदार उत्तर ऐकून समाधानाने हसलेले आमचे हेडमास्तर आठवतात.
तुला लहानपणीची तुझ्या अवती भोवतीची परिस्थिती आणि सद्यपरिस्थिती ह्यात काय फरक जाणवतो
माझ्या लहानपणी सुरक्षित व निवांत आयुष्य होतं. अभ्यासाचं ओझं नव्हतं. आईला घरकामात कसरत करावी लागत नव्हती, वडिलांना ऑफिसच्या कामाचा ताण नव्हता. आता आयुष्य फारच गतिमान झालं आहे. विद्यार्थ्यांना, गृहिणीला, नोकरी वा व्यवसाय करणाऱ्यांना उरस्फोड करावी लागते. एवढं करुन कसलाही निखळ आनंद मिळत नाही.
तुमच्या वेळचा तुझा एखादा आवडीचा खेळ
मला स्वतःला खेळाची आवड नाही. बाकी शाळेत असताना ज्या क्रीडास्पर्धा व्हायच्या त्या बघायला आवडायचं.
तुला वाचनाची प्रचंड आवड आहे हे तुझ्या कधी लक्षात आलं आणि तुझ्या लहानपणी काय पर्याय उपलब्ध होते?
वाचनाची आवड वाचायला यायला लागल्याबरोबर लागली.
लहानपणी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय घराजवळच होते. तिथून पुस्तकं आणून मी वाचत असे. नातेवाईकांकडे गेलं की त्यांच्याकडची पुस्तकं मी वाचत बसत असे. चण्यादाण्यांबरोबर, वाणसामानाबरोबर, इस्त्रीच्या कपड्यांबरोबर आलेले कागद मी वाचत असे. वाचन असेल तर व्याकरण आपोआप आत्मसात होतं. नंतरच्या काळात मुलांचा अभ्यास खूपच वाढल्यामुळे त्यांना अवांतर वाचन करायला वेळच मिळत नाही. ही परिस्थिती बदलली गेली पाहिजे.
आजी आणि तू, तुम्हा दोघींचा आवडता छंद?
आईला व मला नाटक व सिनेमा बघायची आवड होती.
तू शिक्षण करता करता नोकरी केलीस, मागे वळून बघताना तुला ह्या गोष्टीचा अभिमान वाट्तो की समाधान?
नोकरी करुन शिक्षण पार पाडता आलं ह्याचं अतीव समाधान वाटतं. फार चमकदार यश मिळालं नाही, पण एकही वर्ष वाया गेलं नाही हे विशेष...कारण तेव्हा अभ्यासाच्या शंकांचं निरसन करण्याची काहीच सोय नव्हती. शिवाय, शालेय शिक्षण मराठी माध्यमात झाल्यामुळे महाविद्यालयातलं इंग्लीश माध्यम जड गेलं.
नोकरी करत असतानाची तुझी धावपळ मला आठवते. पण त्यामुळेच आपली तब्येत चांगली राहीली असे तुझे म्हणणे असते. का गं?
नोकरीमुळे तब्येत चांगली राहिली हे अगदीच खरं आहे. सकाळ-संध्याकाळ मिळून मी १० जिने चढाय-उतरायची.
नोकरीमुळे तुला वाचन आणि रेडिओ वरची जुनी गाणी ऐकणं हे फारसं करता नाही आलं. स्वेच्छानिवृत्ती नंतर तू तुझी ही आवड जोपासलीस का?
स्वेच्छ्यानिवृत्तीनंतर वाचन व गाणी ऐकण्याची आवड थोडीफार पुरवता आली. पण पित्तप्रकृतीमुळे फार वेळ गाणी ऐकवायची नाही आणि पुस्तकंही वाचवायची नाहीत. आधी तब्येत चांगली होती तर वेळ नव्हता, नंतर वेळ आहे तर शरीरातला जोम कमी झाला. त्यामुळे आवड मर्यादित स्वरुपात जोपासता आली.
आई, तुझं अगाध वाचन, मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, भाषांतराचा दांडगा अनुभव ह्या सगळ्याचा माझ्यावरही खूप प्रभाव आहे. बघता क्षणी, व्याकरणातील चुका समजणं आणि ते सुधारल्याशिवाय पुढे जाता न येणं हे तुझ्याले गूण मी जसेच्या तसे घेतले आहेत. जणू हा माझा वारसा आहे! तुला काय वाटतं?
भाषेची आवड व अचुकतेचा आग्रह हे गुण मुळातच तुझ्याकडे आहेत. ते आम्हा दोघांकडून तुझ्यात आले आहेत.
"करून बघा , प्रयत्न करा, आधीच नाही म्हणू नका !" हे तुझे ब्रीदवाक्य. ह्याचा मला पदोपदी उपयोग होतो. माझ्यात हा विश्वास तूच निर्माण केला. तुझ्यात कोणी केला?
शेवटपर्यंत प्रयत्न करत रहाणं ही वृत्ती माझ्यात जन्मजातच असावी असं वाटतं. तसंच, आईचा आग्रही स्वभाव व अण्णांचा व्यवस्थितपणा हे गुणही माझ्यात आले आहेत. मला ह्याचाही फार आनंद वाटतो.
आई, तू माझा रीतसर अभ्यास तर घेतलास पण येता जाता तू वाचलेलं जे जे मला सांगितलं ते अजूनही आठवतं! हे नकळत अभ्यास करून घेणं तुलाच जमू शकतं.
"पाव भाजी, छोले कराच पण रोजचा स्वयंपाक आलाच पाहिजे". हे मला जुन्या काळातले विचार वाटायचे. पण लॉक डाऊन च्या काळात मला ह्याचा प्रत्यय आला. त्याबद्दल खरंच खरंच धन्यवाद!!
मागे वळून न बघता कायम पुढे चालत राहणं, ही तुझी सुंदर शिकवण मी अमलात आणायचा प्रयत्न करते पण तू हे खरोखरच जगलीस! छान!! मला अभिमान आहे मी तुझी मुलगी असण्याचा!!